Wednesday, January 1, 2020

छ.शिवाजी महाराज समजून घेताना.

             छ.शिवाजी महाराज समजून घेताना... !


              फक्त आमच्याच संघटनेचे छ. शिवाजी महाराज खरे, बाकीचे खोटे आहेत कारण आम्हीच खरे शिवभक्त आहोत. (तसं आमी शिवभक्तीच पण प्रशस्तीपत्रक वाटतो) आम्ही शिवाजी महाराजांना वाईट लोकांपासून वाचवतोय (?) आणि समाजाला सुसंस्कृत करतोय. आमच्या पद्धतीने सर्व काही झाले पाहिजे नाहीतर महाराजांच्या काळातील हत्यारे तशीही अजून आम्ही सदैव परजत असतो. आणि आमच्या सोयीस्कर दृष्टीने कोणी थोरल्या आणि धाकल्या महाराजांचा अपमान केला तर त्याची खांडोळी करावयास आम्ही नेहमीच आमच्या आमच्या संघटनेच्या आशीर्वादाने पुढे येतो.
खबरदार आमचे शिवाजी महाराज नावाचे दुकान कोणी बंद करावयास आला तर चिंधड्या उडवल्या जातील. हो, दुकान मांडलंय आम्ही कारण शिवाजी एक विचार म्हणून पेलतच नाही आम्हाला मग आम्ही मोकळे होतो स्वतःला हवे तसं महाराजांना वागवायला, तसं हे फारच सोपय तरुण मुलांपुढे फक्त शिवाजी आणि संभाजी महाराज की जय म्हणले की त्या जयघोषाच्या निनादात आमच्या मनातील विषवल्ली समाजात पसरवायचा मार्ग सहज खुला होतो. भगवा टिळा लावायचा, दाढी वाढवायची, गळ्यात अथवा मनगटावर महाराजांची मुद्रा असलेले लॉकेट अडकवायचं. (अंगरखा ही शिवमय झालाय हल्ली), स्वयं घोषित शिवभक्तांचे चिथावणीखोर व्हिडिओ पहायचे मग काय आम्हीसुद्धा शिवभक्त म्हणून मिरवायला तयार. आतातर काही आमच्यातील नवतटस्थवादी तरुण सांगू लागलेत की आपल्या मागे झुंड हवी, कोणत्याही मुद्याला हात घालायचा असेल तर, आणि मग अशा झुंडी आपापसांत भांडायला ते ही महाराजांच्या नावाने पुढे सरसावतात. अहो मला सांगा भक्ती करायला अक्कल थोडीच लागते?  नुसतं खाली झुकून मुजरा महाराज म्हणायचं नाहीतर नावापुढं किंवा मागं महाराजांचा अर्थबोध होईल असं विशेषण लावायचे. तशी आम्ही आता महाराजांची आरती पण तयार केलीय जयदेव जयदेव जय शिवराया म्हनायचं आणि आमचे आराध्य दैवत नुसतं पुजायचं, झालंच तर चौका चौकात पुतळे उभा करायचे त्या पुतळ्याला रोज हार घालायचा जय भवानी जय शिवाजी घोषणाबाजी करायची मग बघा कस रक्त उकळतय आणि एकदा का अशी उकळी फुटली की संघटनेचा आदेश येतोच, कुणाला तरी झोडायचं किंवा काहीतरी पेटवायचं कधी मधी मोर्चे काढायचे आंदोलनं करायची जणू महाराजांचं मावळच, नुसता जाळ न धूर. आता ह्या जाळात कोण होरपळतेय आणि धुरामध्ये कोण गुदमरतेय हे आम्हाला समजलं असत तर महाराजांचा अभ्यास नसता का केला? नेतं सांगतील तसच आमचं महाराज होते आम्ही ते खरच कसे होते कधीच शोधणार नाही तेवढा वेळ कुणाकडे आहे. आणि ज्या फार थोड्या लोकांकडे वेळ आहे त्यांनी त्यांचे शिवाजी नावाचे दुकान कधीच उघडलय आणि आम्हांला त्यावर भालदार आणि चोपदार म्हणून ठेवलय. आमाला वाटतंय आम्ही महाराजांचीच सेवा करतोय. असुदे या आंधळ्या आनंदात राहणे आमाला आवडतंय,पण आमच्या मुळं खरंच कुणाचं वर्तमान होरपळत असेल का आणि भविष्य गुदमरत असेल का? तुम्हीच करा विचार, आमाला तस पण ह्या पवित्र भूमीवर आमचा शेवट कसा होईल याची पर्वा नाही. ही भूमी लय पवित्र हाय, पण आमच्या मरणाला इथं किंमत नाय!

#आम्ही_जगणार_कारण_जगणं_आमचा_हक्क_हाय_तुम्ही_पण_जगा_कारण_जगणं_कोणाची_मेहरबानी_नाय



सौरभ सूर्यवंशी

No comments: